गणेश विसर्जनावेळी मोठी दुर्घटना; तलावात बुडून ६ मुलांचा मृत्यू

Foto
हैद्राबाद : गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात तेलंगणामधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ६ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या या लहान मुलांचा अचानक तोल गेल्याने ती खोल पाण्यात बुडाली. एकाच वेळी ६ मुलांचा जीव गेल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, उत्सवाचा आनंद क्षणात भीषण दुःखात बदलला आहे.

बुधवारी तीन दिवसांच्या बाप्पाला देशभरात निरोप देण्यात आला. मात्र, तेलंगणातील पेड्डाकंजेर्ला गावात गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना ही मोठी दुर्घटना घडली. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना कशी घडली?
प्राथमिक माहितीनुसार, पेड्डाकंजेर्ला गावातील काही मुले गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नेरेडू चेरुवू तलावावर गेली होती. विसर्जनादरम्यान ही ६ मुले पाण्यात उतरली. विसर्जन करत असताना ती नकळत खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. मुलांना पोहता येत नव्हते, त्यामुळे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा लोट जास्त असल्यामुळे ते स्वतःला वाचवू शकले नाहीत, अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली. ही दुर्घटना घडताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत मृत्यू पावलेली सर्व मुले ही शिरीषा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होते. या ६ मुलांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गाव या धक्क्यातून सावरू शकलेले नाही.

प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू
दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताशी संबंधित सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, मुले खोल पाण्यात कशी पोहोचली आणि विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. मृत मुलांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.